Sunday, July 31, 2011

पेशन्स

पेशन्स. माणूस इम्पेशन्ट झाला की हा शब्द उच्चारतोच उच्चारतो. मराठीत सहजपणे मिसळलेल्या इंग्रजी शब्दांपैकी हा एक शब्द. पण इंग्रजी शब्द मराठीत आला की ब-याच वेळा त्याचं लिंगवचन वेगवेगळे पंथ वेगवेगळं ठरवतात. मग तो इमेल का ती इमेल; तो टायर का ते टायर; तो केक का ती केक अशी कोडी जन्माला येतात. खरं तर ही कोडी नाहीत, गमती आहेत. अशा अनेक गमतींपैकी गेले काही दिवस परत परत अनुभवतोय ती ही गंमत.



एक जण परवा अगदी तावातावाने एका घडलेल्या प्रसंगाचं वर्णन करून सांगत होता. त्यात किमान ३-४ वेळा ’मग मात्र माझे पेशन्स संपले’ असं म्हणाला. हा वाक्यप्रयोग मी आधीही ऐकलेला आहे आणि प्रत्येक वेळी तो तितकाच मजेशीर वाटलाय. ’पेशन्स’ चं अनेकवचन होऊच कसं शकेल? कमाल करतात मंडळी :D आणि अगदी ठासून सांगत असतात की मी खूप पेशन्स ठेवले वगैरे. बरं सांगायला गेलं तर काही सूज्ञ मंडळींना पटतं; बदल व्हायला वेळ लागतो खरा, पण पटतं. काहींना मात्र त्यांचंच बरोबर वाटतं. मग २-३ वेळा मी सांगून बघतो; तरीही मानत नसेल व्यक्ती की मग ’माझेही पेशन्स संपतात’! :P

सानिया..

नुकतंच विम्बल्डन पार पडलं. भारताची (?) महिला टेनिसपटू, जिच्यावर दरवेळी अपेक्षांचा वर्षाव होतो (का ते कळत नाही) ती As Usual चार दोन सुसाट फ़ोरहॅंड आणि असंख्य डबल फ़ॉल्ट करून बाहेर पडली. पेपरात मागल्या वर्षीची Copy-Paste केलेली बातमी :- ’विम्बल्डन मधील महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात’. तर, परवा एका सानियाभक्त मित्राशी या विषयी बोलताना सुचलेले हे काव्य. यातील आशय केवळ गमतीत घ्यावा अशी विनंती.


सानिया च्या फ़ॅन्स नी भरली टेनिस कोर्ट ची बाकडी
सानिया ने मात्र केली पहिलीच सर्व्हिस वाकडी

उत्साहात आणि आनंदात पडलं कसं सॉल्ट
एका मॅचमधे तिने केले १०० डबल फ़ॉल्ट

टेनिसमधे रॅंकिंग म्हणे कपड्यांवरून ठरतं
म्हणून बहुदा घालते ती मिनी मिनी स्कर्ट

कधी कुठे एकदा म्हणे स्पर्धा तिने जिंकली
जिंकली म्हणून हवेत गेली, तिथेच माशी शिंकली

मोजक्या विजयांच्या जोरावर गाडी अजून पळतेय
लोकं मूर्ख बघतायत, आणि ही वेडी खेळतेय

- अपूर्व

Saturday, July 30, 2011

३० मिनिट.. नही तो फ़्री

मी ’राईट लेन’ मधून गाडी चालवत होतो. उजव्या बाजूला पत्र्याची भिंत उभारलेली रस्त्याच्या कामानिमित्त. आणि अशात एकदम, हॉर्न न वाजवता किंवा इतर कुठलाही संकेत न देता एक बाईक कुठल्याशा फ़टीमधून अचानक गाडीसमोर अवतरली. मी अचंबित, क्रोधित वगैरे व्हायच्या आतच तडमडत तो बाईकवाला पुढे निघून गेला.सुदैवाने आमची वाहने भिडली नाहीत, घासली नाहीत; नाहीतर खरंच तो पडला असता आणि मग गोंधळ झाला असता.

पिझ्झा हट चा पोचव्या होता तो. हे पिझ्झा पोचवणारे...अनेकदा बघतो त्यांना आणि ते सगळेच भयानक रॅश चालवतात बाईक. दोष सर्वस्वी त्यांचा नाही. ’३० मिनिट.. नही तो पिझ्झा फ़्री’ अशी अ‍ॅड करणारे यांच्याच जिवावर अ‍ॅड करतात. मला माहित नाही यांची सिस्टिम काय असते ते. पण बहुदा ३० मिनिटांच्या आत पोचवून ’फ़्री’ पिझ्झा देणं टाळलं की ईन्सेन्टिव्ह असावा, आणि फ़्री पिझ्झा द्यावा लागला तर पेनल्टी असावी. कारण अक्षरश: जिवावर उदार होऊन ते बाईक चालवत असतात, पर्यायाने स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत असतात.



मला फ़ार दया येते त्यांची. आजवर मी कधीही फ़्री पिझ्झा मागितलेला नाही आणि मागणारही नाही ते याच कारणासाठी. मी उलट त्या माणसाला सांगतो की बाबा हळू चालव. मला राग अशा अ‍ॅड करणा-यांचा येतो. मुंबई-ठाण्याच्या ट्रॅफ़िक मधे आज कुठलाच माणूस एखाद्या ठिकाणी वेळेवर पोचण्याची हमी देऊ शकत नाही अशी अवस्था आहे, आणि त्यात या अशा ऑफ़र किंवा स्कीम म्हणजे चक्क मूर्खपणा आहे. 

माझं फ़क्त असं सांगणं आहे की पिझ्झा कंपन्यांनी एवढं लक्षात घ्यावं की त्या ३० मिनिटापायी जीव जायला ३० सेकंद सुद्धा लागणार नाहीत. तेंव्हा ३० मिनिट नही तो फ़्री म्हणताना डिलिव्हरी बॉईज चा जरा विचार करावा. आणि एक पिझ्झा फ़्री घेतला म्हणजे आपलीही फ़ार मोठी अचीव्हमेंट किंवा सेव्हिंग होत नाही त्यामुळे ३५ व्या मिनिटाला पिझ्झा आला तर फ़्री मागताना आपणही विचार करायला हवा.

Wednesday, July 27, 2011

करकचून...


मुंबईत बसमधून प्रवास करताना बसायला जागा मिळणं म्हणजे थोर नशीब. नाहीतर उभं रहायला लागतं. आणि मुंबईत बसमधे उभं रहाणं म्हणजे ट्रॅफ़िकमधे गाडीत बसण्याईतकंच त्रासदायक असतं. आणि मग असं उभं रहावं लागलं की माझी अवस्था काहीशी अशी होते...


बस ड्रायव्हर जेंव्हा करकचून ब्रेक लावतो
माझ्या रागाचा पारा सरसरून वर धावतो

वाटतं त्याला जाऊन सणसणून लाथ द्यावी
विचारांना कृतीची भरभरून साथ द्यावी

इतक्यात एमपीथ्रीत एक गाणं दणदणून वाजतं
शरीर मन ठेक्यागणिक तरतरून टाकतं

मूड कसा माझा फ़सफ़सून वर येतो
लक्ष माझं एकवटून मी गाण्यावर देतो

मनातल्या मनात एक कचकचून शिवी देतो
भरकटलेल्या विचारांना दिशा नवी देतो...


- अपूर्व

Tuesday, July 12, 2011

देवदर्शन

देवळात तसं माझं फ़ार जाणं होत नाही. पण सर्वसाधारण लोकप्रिय किंवा जिथे लाखो भक्तगण जातात अशा देवळांत गेलो आहे. पंढरपूर च्या वारीच्या निमित्ताने परवाच ऑफ़िसात विषय निघाला होता तेव्हा एकाने शिर्डी, कोल्हापूर च्या देवस्थानांचे आणि तिथल्या गर्दीचे काही किस्से सांगितले तेव्हा सहज वाटलं, की अशा प्रकारे प्रचंड गर्दीत देवस्थानात जाणं, म्हणजे काहीसं एखाद्या सिनेता-याची किंवा तारकेची स्वाक्षरी घ्यायला जाण्यासारख आहे. 

त्या ता-या किंवा तारकेचे जसे लाखो चाहते, तसे देवाचे लाखो भक्त. त्या ता-या किंवा तारकेची सही घेणं हा काही सेकंद चालणारा प्रसंग, की ज्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते. काहीसं तसंच देवदर्शनाचं झालंय. मूर्तीसमोर येताच ’पुढे चला’ ’आगे चलो’ म्हणत तिथे बसलेले पुजारी भक्तीभंग करतात, आणि भारतात जनतेला ढकलाढकली हा एक विशेषाधिकार आहेच. सहाजिकच, अशावेळी त्या ता-याचं किंवा तारकेचं जसं सही घेणा-या चाहत्याकडे लक्षही नसतं, तसंच देवाचंही होत असेल... 

Wednesday, July 6, 2011

अपभ्रंश / Name Parodies


नाव म्हटलं की त्याचा अपभ्रंश झालाच समजा. अनेकदा तो जाणून बुजून केला जातो; जसं की, समीर च्या जागी ’सॅम’, विकास/विक्रांत च्या जागी ’विकी’ वगैरे. पण ’चुकून’ काही वेळा नावांचं, शब्दांचं जे विडंबन होतं ना, ते फ़ार मजेशीर असतं.

असंच गेल्या काही दिवसांत मी निरीक्षण केलं. एक व्यक्ती जिचं नाव ’फ़िलोमिना’ आहे, त्या व्यक्तीच्या नावाचे अनेक अपभ्रंश मी ऐकले. ते असे:

फ़िलोमिनो
फ़िनोमिनो
फ़िलोमिला
फ़िलोमिलो
पण सर्वात हसू आणणारा अपभ्रंश म्हणजे, ’फ़िनॉमिना’. जितक्या वेळेला संबंधित व्यक्तीने हा शब्द उच्चारला तितक्या वेळेला आणि त्यानंतर कितीकदा ते आठवून हसू आलं.



We often hear words and names being pronounced incorrectly which sometimes create great humor. One such case is about the name 'Philomena'. I have been discovering some great versions of this name over the last couple of weeks, which are:

Philomeno
Phinomeno
Philomela
Philomelo

But the greatest one which made me laugh everytime it was pronounced and several times thereafter was 'Phenomena' and I am laughing even now as I write this.