Tuesday, July 9, 2013

लोहगड ची जत्रा | A crowded 'Lohagad Fort'

लो. ह. गड - लोकांमध्य॑ हरवलेला गड.

परवा लोहगडाच्या जत्रेला गेलो होतो. दुस-यांदा. पहिल्यांदा गेलो होतो ते मागच्या वर्षी. पावसाळ्याच्या नंतर. पण ती जत्रा नव्हती. तेंव्हा त्याचं ते हिरव्या गार रंगात नटलेलं रूप बघून, चिलखती, दणकट असं रूप बघून भारावून गेलो होतो. खूपच रंजक झाली होती ती भेट. दुस-या भेटीचा अनुभव मात्र वेगळा होता.

आम्ही पोहोचलो तेंव्हा प्रथमदर्शनी दिसली ती केवळ गर्दी. एक क्षण वाटलं की आपण बार मधे वगैरे आलो आहोत की काय!, कारण दारूच्या बाटल्या हातात घेऊन टोळकी वावरत होती. मग वाटलं की आपण पार्टीत वगैरे आलो असू, कलकलाट, स्टीरिओज चा ठणाणा, चाललेले अश्लील नाच, आणि पैशाचं, त्याच्या माजाचं मांडलेलं प्रदर्शन; हे सगळं पार्टीतच असतं ना?

या संभ्रमातच आम्ही गर्दीतून वाट काढत पुढे निघालो. पायाला दारूच्या, पाण्याच्या बाटल्या, चिप्स ची पाकिटं, या गोष्टी लागत होत्या ख-या, पण त्याक्षणी त्यावर भाष्य करण्यात काही अर्थ नव्हता. गर्दीतून ढोसाढोशी करतच आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचलो. आम्ही ढोसाढोशी केली तो नाईलाज होता, पण तिथे आलेल्या बहुतेकांचं तेच उद्दिष्ट होतं
 

गडावर आल्यावर प्रथम डावीकडे गेल्यावर अष्टकोनी तलाव लागला. तलावाचा सार्वजनिक स्विमिंग पूल झाला होता. लोकं उड्या मारत होते, एकमेकांना ढकलत होते, किंचाळत होते, लक्ष वेधण्यासाठी जमतील ते चाळे करत होते. काहीकाळ त्या चाळ्यांत हरवलेला तो तलाव न्याहाळून पुढे निघालो. दर्ग्याच्या बाजूने चालताना दर्ग्यात बघितलं तर तिथे चार-दोन टकली एकाट बसली होती. गर्दुल्लेच वाटत होते. त्यामुळे तिथे जाण्याची इच्छाही झाली नाही. मग इमारतींचे अवशेष बघत विंचू काट्याकडे जात होतो. ढगाने अवघा परिसर वेढला होता. २० फुटापलिकडे काहीही दिसत नव्हतं. पण गर्दी मात्र चिक्कार होती आणि ती ऐकू येत होती. विंचू काटा दिसणं तर अशक्य होतं. त्याच्या काहीसं आधी एक छोटासा कातळातला उतार आहे. तिथे निसरडं होतं त्यामुळे पुढे फारसं कुणी जात नव्हतं. पण त्या 'स्पॉट' वर फोटो काढण्यासाठी झुंबड उठली होती.





फिरून लक्ष्मी कोठीजवळ येऊन ५ मिनिटं शांत विसावू म्हटलं, आणि त्या दिशेने निघालो. लक्ष्मी कोठी नजरेस पडली. आणि तत्क्षणी त्यातून एक इसम बाहेर पडला, हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी घेऊन. रिकाम्या दारूच्या बाटल्या असाव्यात. ती पिशवी त्याने सर्रळ वरून खाली धुक्यात टाकून दिली. माझ्याशी नजरानजर केली. आणि पुन्हा आतून ऐकू येणा-या कलकलाटात सामील झाला. इथे आणखीच कुठली तरी 'कोठी' आहे असं वाटलं. 'लक्ष्मी' असं तिथे वाचून हळहळ वाटली. पुढे तिथे थांबण्यासारखं काहीच नव्हतं.
निराश होऊनच पाय-या उतरू लागलो. गणेश दरवाज्याच्या जवळ असलेल्या दीप लावायच्या खोबणीत चार टपराक मुलांचा जर्दा-मावा बेत चालू होता. तंबाखूत काहीतरी कालवत होते ते. काय ते कळलं नाही पण पिठीसाखर नक्कीच नव्हती ती. अर्थातच दुर्लक्ष करून मार्गस्थ झालो. उतरताना पाय-या जरा निसरड्या झाल्या होत्या. तिथे 'केवळ चार जणांना सांगायला एक स्वकर्तृत्वाची गोष्ट असावी' म्हणून ट्रेकिंग (अर्थात जाणकार म्हणतीलच इथे, की हे काय ट्रेकिंग आहे? ट्रेकिंग करायचं तर इथे इथे चला.... असो.) करायला येणा-या लोकांचं, विशेषत: मुलींचं/बायकांचं आउच्-उफ्फ चालू होतं, आणि त्यांना इथे आणणा-या मुलांची/माणसांची त्यांना हात देण्यासाठीची धडपड चालू होती. (का? ते आपण जाणताच)
 

चिंब भिजलेल्या अवस्थेत, रिमझिम पावसात मस्तपैकी गरमागरम मसालेदार मक्याचं कणीस खायची मजा औरच. ती मजा घ्यायला एका मावशींच्या टपरीवर गेलो. तिथे 'चुलीतल्या कोळशावर सिगारेट पेटवण्याची मजा काही औरच' म्हणणारं एक टोळकं आलं. चुलीवर सिगारेटी पेटवून आपले माकडचाळे तिथल्या माकडांना दाखवू लागलं.

तिथे एक बोर्ड लावला होता कुण्या वनखात्याने की इतिहास संवर्धन खात्याने. त्यावर लिहिलं होतं, की कचरा करू नका, इतिहासाचं रक्षण करा नि काय काय. त्या माकडचाळे करणा-या टोळक्याने आपली सिगारेटची थोटकं त्याच्च बोर्डाखाली टाकली. माझ्या उद्विग्नतेला कळस चढला. आणखी काही बघायची इच्छा उरली नव्हती. 'लोहगड संपलाय. आता हा एक पिकनिक स्पॉट आहे.' असं माझ्याशीच मी म्हटलं. सिंहगड; रायगड; कळसुबाई; राजमाची; आता लोहगड... अशी एक एक ठिकाणं आपल्यासाठी वर्ज्य होत जातील असं वाटतंय आता. मी ऐकलंय की हरिश्चंद्रगडही पाचनई च्या वाटेने कुण्णीपण करू लागलंय. माझ्यासाठी ड्रीम ट्रेक आहे तो. त्याचा लोहगड व्हायच्या आत तिथे जाऊन आलं पाहिजे बाबा.

No comments:

Post a Comment